मुंबई : पावसाळ्यातील भ्रमंतीच्या वाटा दाखविणाऱ्या जुलैच्या ‘आपलं मंत्रालय’चे  प्रकाशन महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) सुरेश वांदिले,उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलूरकर, वरिष्ठ सहायक संचालक मनीषा पिंगळे, सहायक संचालक मंगेश वरकड आदी उपस्थित होते. श्रीमती कुंदन या अंकाच्या अतिथी संपादक आहेत.

पावसाळा म्हटलं की सर्वांची पावलं वळतात ती धबधब्यांकडे. अशाच काही महत्त्वाच्या प्रसिद्ध धबधब्यांची माहिती देणारा ‘रिफ्रेश करणारे धबधबे’ हा लेख या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे. पावसाळी पर्यटनासाठी घराबाहेर पडताना काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे याची माहितीदेखील या अंकात आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात घ्यावयाच्या आरोग्याच्या काळजीबाबतच्या लेखाचाही अंकात समावेश आहे. विधानभवनातील समृद्ध ग्रंथालयाची ओळख या अंकात करून देण्यात आली आहे. मुंबई येथील प्रसिद्ध ठिकाणांची पावसाळ्यातील टिपलेली छायाचित्रे, व्यंगचित्रे, अनुभव, कविता आदींच्या समावेशामुळे अंक अधिक वाचनीय झाला आहे.