नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत म्हणजेच (आरबीएसके) कार्यरत असणारे बीएएमएस डॉक्टर हे एमबीबीएस डॉक्टरांएवढेच काम करुनही त्यांना या डॉक्टरांच्या अर्धेही मानधन दिले जात नाही. त्यामुळे समान कामासाठी समान वेतन द्या, अशी मागणी आरबीएसके संस्थेचे वैद्यकीय अधिकारी संघटनेनं केली आहे.

आरबीएसके च्या वैद्यकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ.हेमराज मसराम यांनी नुकतच गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविल आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि औषध निर्माता ठिकठिकाणी कार्यरत आहेत. ते अनेक गंभीर आजारांचं निदान करुन औषधोपचार करतात.

गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात संदर्भित करुन त्याचा पाठपुरावा करतात. आदी अनेक कामे करूनही त्यांना अत्यल्प मानधन मिळतं असंही या निवेदनात म्हटलं आहे. इतर अनेक राज्यांमध्ये त्यांना एमबीबीएस डॉक्टरांएवढे मानधन मिळते त्यामुळे राज्यातही त्यांना तेवढे मानधन मिळावे अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.