नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी 23 जुलै रोजी दिल्ली, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात 13 ठिकाणी छापे घातले. या पैकी काही ठिकाणांमध्ये राजकीय वर्तृळात संपर्क असलेल्या प्रभावी व्यक्तींची अघोषित संपत्ती आढळली. या छाप्यांमध्ये आत्तापर्यंत मिळालेल्या पुराव्यांमधून मालमत्ता व्यवहार, बांधकाम व्यवसायातील काही व्यवहारांमध्ये अघोषित रोख व्यवहार झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यवहारातून निर्माण झालेला काळा पैसा गुंतवण्यासाठी परदेशी कंपन्यांच्या नावे मालमत्ता घेण्यात आल्या आहेत.
अशा अनेक व्यक्तींच्या या बनावट परदेशी मालमत्ता गेली कित्येक वर्ष उजेडात आल्या नाहीत. या मालमत्तांच्या व्यवहारात अनेक दिग्गज व्यक्ती आणि संस्थांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. या व्यक्तींपैकी एक जण अलिकडेच कॅराबियन बेटाचे नागरिकत्व मिळवण्याच्या प्रयत्नात होता असेही तपासात समोर आले आहे.
या छाप्यांनंतर केलेल्या तपासातून या संबंधित व्यक्तीची 200 कोटी पेक्षा अधिक परदेशी मालमत्ता समोर आली आहे. त्याशिवाय या व्यक्तीने 30 कोटी रुपयांचा कर चुकवला असल्याचेही निष्पन्न झाले आहे. या छाप्यांनंतर या व्यक्ती विरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायद्यासह अनेक प्रकरणी फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे.