मुंबई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींची मर्यादा ५ वरुन २० पर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत (म.ग्रा.रो.ह.यो.) एका ग्रामपंचायतमध्ये एका वेळी ५ सिंचन विहीरी मंजूर करता येतील अशी मर्यादा यापूर्वी घालून देण्यात आलेली होती. सिंचन विहिरींच्या कामांची शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे ही मर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीचा विचार करून श्री.भुमरे यांनी पुढीलप्रमाणे ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सिंचन विहिरीची मर्यादा वाढवून देण्यास मंजुरी दिली आहे.

ग्राम पंचायतींची लोकसंख्या

१५०० पर्यंत असेल तर ५

१५०१ ते ३००० पर्यंत १०

३००१ ते ५००० पर्यंत १५

५००१ च्या वरील लोकसंख्या असेल तर  २०

विहिरींची संख्या असणार आहे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक सिंचन विहिरी लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती  होणार असल्याने निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश श्री.भुमरे यांनी यावेळी दिले.