मुंबई : विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्थापन करण्यास  मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाज्योती संस्थेच्या माध्यमातून या समाजसमुहांच्या विकासासाठी आता अधिक नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत.

पुणे येथे स्थापन करण्यात येणारी महाज्योती ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असणार आहे. तिची नोंदणी कंपनी कायद्यानुसार करण्यात येणार आहे. महाज्योती संस्थेची स्थापन करण्यासह तिच्या कामकाजासंदर्भात वेळोवेळी आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या मंत्र्यांना देण्यात आले आहेत.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी 1978 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या नावाची संस्था पुणे येथे स्थापन झाली. या संस्थेस 2008 मध्ये स्वायत्त दर्जा देण्यात आला असून 2014 पासून तिचा अत्यंत वेगाने विकास झाला आहे. तसेच जून 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या नावाची स्वायत्त संस्था स्थापन झाली आहे. या संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात बहुजनांच्या सामाजिक व शैक्षणिक क्रांती-विकासात छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अमूल्य वाटा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने सध्या दोन स्वायत्त संस्था कार्यरत आहेत.  त्याप्रमाणेच बहुजन, दुलर्क्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही एक स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.