पुणे : “महाराष्ट्रातील मंदिरे आणि धर्म स्थळांचे दरवाजे सर्व नागरिकांसाठी उघडावे” या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे. भारतीय जनता पार्टीचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून भाजपाच्या पुणे शहर कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी असलेल्या प्रमुख धर्मस्थळाजवळ या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन शहराध्यक्ष श्री जगदीश मुळीक यांनी केले आहे.
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होताना फेस मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे इत्यादी कोरोनासाठीच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना श्री जगदीश मुळीक यांनी केल्या आहेत.
केंद्र सरकारने सर्व मंदिरे आणि धर्मस्थळे उघडण्यास परवानगी देऊन सुद्धा ठाकरे सरकार अजूनही परवानगी देत नाही. अनेक देवस्थान आणि संस्थांनी अनेक वेळा आर्जव करून देखील महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार काहीही कार्यवाही करत नाही. त्यामुळे नागरिकांना ह्या अडचणीच्या काळात सुद्धा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. “ठाकरे सरकार”ला इशारा देण्याकरिता व देवस्थाने सुरु करा या मागणीसाठी पुणे शहरात “दार उघड उद्धवा दार उघड” अशी हाक देत “घंटानाद आंदोलन” विविध धार्मिक संस्था व संघटनांतर्फे होणार आहे. या आंदोलनाला भाजपा पूर्ण पाठिंबा देत आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील.
उद्या दि. २९ ऑगस्टला सकाळी १० वाजता पुणे शहर भाजपा अध्यक्ष श्री जगदीश मुळीक सारसबाग गणेश मंदिराबाहेर घंटा नाद आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांच्याबरोबर खा. गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आ. मुक्ताताई टिळक, आ. माधुरीताई मिसाळ, आ. सुनिल कांबळे, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. भीमराव तापकीर, उपमहापौर सरस्वती ताई शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष श्री हेमंत रासने, तसेच पुणे शहर सरचिटणीस श्री गणेश घोष, श्री राजेश पांडे, श्री राजेश येनपुरे, श्री दीपक नागपुरे, श्री दीपक पोटे आणि त्यांच्याबरोबर शहर भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील.