मुंबई : शेतीमध्ये आता  विकेल तेच पिकेल हे ब्रीद वाक्य समोर ठेऊन राज्यातील कृषीविषयक स्टार्ट अप्सना तसेच शेतकरी कंपन्या आणि गटांना कशा रीतीने प्रोत्साहन देता येईल याचा कालबद्ध आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कृषी, सहकार व पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

वर्षा येथे परिषद सभागृहात कृषी विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे,मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पणन प्रधान सचिव अनुप कुमार, कृषी सचिव एकनाथ डवले आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, महाराष्ट्रात विकेल ते पिकेल या धर्तीवर विभागवार  पिकांचे नियोजन व्हावे तसेच त्या अनुषंगाने विपणन व्यवस्था व्हावी असा आराखडा तयार करावा. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन होणे फार महत्त्वाचे आहे. त्याच्या पिकांना हमी नव्हे तर हमखास भाव मिळणारी यंत्रणा उभी राहिल्यास शेतकऱ्यास व्यक्तिगत फायदा होईल आणि नफा मिळेल.