पुणे : मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांमध्ये वाढलेल्या पाणी पातळीमुळे महाराष्ट्रातील नागपूर आणि मध्य प्रदेशातील होशंगाबाद, सेरोर आणि रायसेन जिल्हे जलमय झाले आहेत. प्रशासनाच्या विनंतीवरुन दक्षिण कमांडने पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य हाती घेतले आहे.

महाराष्ट्र

31 ऑगस्ट 2020 रोजी, गार्डस रेजिमेंटल सेंटर, कामटी येथील दहा बचावकार्य टीम आणि मिलीटरी अभियांत्रिकी, पुणे येथील तीन अभियांत्रिक कार्य दल नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात मदत आणि बचावकार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. हे दल नागरी प्रशासनास कुहिच्या जलमय भागात अडकलेल्या स्थानिक ग्रामस्थांच्या बचावासाठी आणि पाण्याने वेढलेल्या भागात सामान्य स्थिती बहाल करण्यासाठी मदत करीत आहेत. पनवी आणि गोंडपिंपरी गावातील सुमारे 90 व्यक्तींना पूरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

कामटी कॅन्टोन्मेंट येथील लष्कराच्या दलाने कन्हान नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत केली आहे. गोरा बाजार, छोटी अजनी, उटखाना आणि गोडाऊन परिसरातही मदत पोहचवण्यात आली आहे. लष्कराने कामटी परिसरात अडकलेल्या नागरिकांना अन्न पुरवले आहे. गावांमध्ये पिण्याचे पाणी पुरवले आहे. लष्कराची केंद्र पुरात अडकली आहेत, मात्र नागरिकांना मदत करण्यास लष्कराकडून प्राधान्य देण्यात येत आहे आणि रात्रभर मदत पुरवण्यात आली.  पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात येणाऱ्या स्थानिकांना आवश्यक तेवढे प्राथमिक उपचार व औषधे पुरविण्यासाठी लष्कराचे डॉक्टर आणि नर्सिंग सहाय्यकांची वैद्यकीय पथकेही तैनात करण्यात आली आहेत.