नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीच्या पार्श्वभूमीवर 4 सप्टेंबर रोजी मॉस्को येथे चीनचे  स्टेट कौन्सिलर आणि संरक्षणमंत्री जनरल वे फेंगे यांची भेट घेतली. भारत-चीन सीमा क्षेत्रातील घडामोडी तसेच भारत-चीन संबंधांबाबत दोन्ही मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट व सखोल चर्चा केली.

गेल्या काही महिन्यांत भारत-चीन सीमा क्षेत्रातील पश्चिम क्षेत्रातील गलवान खोऱ्यासह प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) बाजूने घडून आलेल्या घडामोडींविषयी संत्राक्षणमंत्र्यांनी भारताची भूमिका स्पष्टपणे सांगितली. मोठ्या संख्येने सैन्य गोळा करणे, त्यांची आक्रमक वागणूक आणि एकतर्फी स्थितीत बदल करण्याचा प्रयत्न यासह चिनी सैन्याच्या कृती या द्विपक्षीय कराराचे उल्लंघन असून उभय देशांच्या विशेष प्रतिनिधी दरम्यान झालेल्या सामंजस्याचे पालन न करता होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. भारतीय सैन्याने सीमा व्यवस्थापनासंदर्भात नेहमीच अतिशय जबाबदार दृष्टीकोन ठेवला होता, परंतु त्याच वेळी भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याच्या आमच्या दृढनिश्चयाबद्दल साशंक नसल्याची बाब माननीय संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केली.

चीनचे स्टेट कौन्सिलर आणि संरक्षणमंत्री म्हणाले की पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या सहमतीची उभय देशांनी अंमलबजावणी केली पाहिजे आणि संवाद व सल्लामसलतीद्वारे या समस्यांचे निराकरण करणे चालू ठेवावे, विविध द्विपक्षीय कराराचे काटेकोरपणे पालन करावे, आघाडीच्या सैन्यांचे नियमन बळकट करावे आणि परिस्थिती आणखी बिघडेल अशी कोणतीही प्रक्षोभक कृती करु नये. भारत-चीन संबंधांच्या एकूण परिस्थितीवर दोन्ही देशांकडून लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे आणि भारत-चीन सीमा भागात शांतता व स्थैर्य राखले पाहिजे. दोन्ही मंत्र्यांसह सर्व स्तरांवर संवाद कायम राखला पाहिजे असे चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी सुचविले.

भारत-चीन सीमावर्ती भागात शांतता व स्थैर्य राखणे हे द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होण्यासाठी आवश्यक असून मतभेदाचे विवादात रूपांतर होऊ नये म्हणून दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या सहमतीनुसार उभय देशांनी मार्गदर्शन घेतले पाहिजे, असे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार सीमाभागातील सद्यस्थिती आणि थकीत प्रश्न दोन्ही बाजूंनी शांततेने चर्चेच्या माध्यमातून सोडवावेत. चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की चीनला सुद्धा प्रश्न शांततेने सोडविण्याची इच्छा आहे. संरक्षण मंत्र्यांनी सल्ला दिला की, चीनने पांगोंग लेकसह सर्व मतभेद असलेली क्षेत्र लवकरात लवकर रिकामी करण्यासाठी तसेच द्विपक्षीय करार आणि सीमावर्ती भागात शांतता व स्थैर्य राखण्यासाठी नियमावलीच्या अनुषंगाने भारताला सहकार्य करावे. वास्तविक नियंत्रणाच्या रेषेचा काटेकोरपणे आदर आणि पालन करावे आणि एकतर्फी स्थिती बदलण्याचा प्रयत्न करु नये. ते पुढे म्हणाले की, सद्य परिस्थिती जबाबदारीने हाताळली गेली पाहिजे आणि सीमाभागातील तणाव वाढविणारी किंवा परिस्थिती चिघळवणारी कोणतीही कारवाई कोणत्याही पक्षाने करु नये. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी उभय देशांनी राजनयिक आणि लष्कराच्या माध्यमातून चर्चा सुरू ठेवली पाहिजे.