नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात विरोधक सरकारला वाढती बेरोजगारी, आर्थिक मंदी आणि भारत चीन तणाव या विषयांवर घेरण्याची शक्यता आहे. सभागृहात होणाऱ्या चर्चेचे विषय ठरवण्यासाठी  आज झालेल्या सर्व पक्षांच्या सभागृह नेत्यांच्या बैठकीत हे दिसून आल्याचं अण्णा द्रमुक पक्षाचे नेते टी आर बालु यांनी सांगितलं. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीची ही बैठक झाली.

विरोधी पक्षांनी या विषयावर चर्चा करण्याची मागणी केल्याचही बालू यांनी सांगितलं. वस्तू आणि सेवाकराच्या रकमेचा राज्यांना करावयाच्या परताव्याविषयीही चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान संसदेचं कामकाज सुरळित चालण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचं मान्य केलं असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. लोकसभेत अधिक काळ कामकाज होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि अर्जुन राम मेघवाल आदी उपस्थित होते.