नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांबाबत संभ्रम निर्माण केला असून विरोधक या मुद्द्यावर राजकारण करत असल्यचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून ,या कायद्यातील तरतुदींचा उल्लेख कॉंग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात होता असं जावडेकर म्हणाले. उत्पादन खर्चापेक्षा अधिक हमी भावाची शेतकऱ्यांची मागणी असून सरकार उत्पादन खर्चाच्या ५० टक्के जास्त हमी भाव देत असल्याचं त्यांनी सांगितलं.
तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आज भारत बंद आंदोलन पुकारलं असून, विरोधकांनी त्याला पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जावडेकर बोलत होते.