मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वैद्यकीय सेवा आणि कोविड-१९ च्या उपाययोजनांना अधिक प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिल्या.

मंत्रालयात आज पनवेल महानगरपालिकेतील कोविड-१९ उपाययोजना संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार बाळाराम पाटील उपस्थित होते.

कुमारी तटकरे म्हणाल्या, कोविड-19च्या रुग्णांची वाढती संख्या पाहता येणाऱ्या काळात पालिकेच्या इतर खर्चांवर नियंत्रण ठेवून वैद्यकीय सुविधांवर अधिक भर देण्यात यावा. सद्यस्थितीत महानगरपालिका हद्दीतील डॉक्टरांची संख्या, हॉस्पिटल्स, उपलब्ध खाटा, व्हेंटिलेटर व ऑक्सिजन पुरवठा या बाबींकडे अधिक लक्ष द्यावे.

`माझे कुटुंब माझी जबाबदारी` या मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेने सुरू केलेल्या सर्वेक्षणात आरोग्य विभागाच्या प्रतिनिधींसोबत स्थानिक लोकप्रतिनीधींनी तरुण स्वयंसेवकांना सहभागी करुन घ्यावे, तसेच या टीमनी घरोघरी जाऊन नागरिकांची वैद्यकीय माहिती संकलन करून योग्य मार्गदर्शन करावे आणि नागरिकांनी सुद्धा या टीमला सहकार्य करावे, असे आवाहनही कु.तटकरे यांनी यावेळी केले.

बैठकीला महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, संबंधित अधिकारी उपस्थित होते.