पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. आज पहाटे सहा वाजता त्यांनी संत तुकाराम नगर स्टेशन येथे जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. मेट्रोच्या कामासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे व पिंपरी-चिंचवड मेट्रोचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत तुकाराम नगर ते पिंपरी (खराळवाडी) असा प्रवास मेट्रोने केला. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास फुगेवाडी येथून पाहणी दौऱ्याला प्रारंभ केला. यावेळी अजित पवार यांनी मेट्रो चालकाच्या केबिनमधून पाहणी केली व कामकाजाचा आढावा घेतला. ब्रिजेश दीक्षित यांनी सादरीकरणाव्दारे माहिती दिली. सिव्हील कोर्ट,नळस्टॉप,लकडी पूल व स्वारगेट येथील कामाचीही त्यांनी पाहणी केली तसेच आधुनिक पदधतीने बोगदा खोदकाम करणाऱ्या नवीन मशिनचेही मेट्रोच्या कामासाठी लोकार्पण करण्यात आले. यावेळी मेट्रोचे गौतम बिऱ्हाडे, श्रीमती सरला कुलकर्णी यांनी सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. यावेळी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.