मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं अंतिम वर्षाच्या परिक्षा घ्याव्यात असा निर्णय दिल्यानं नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात अंतिम वर्षाच्या परीक्षा ६० टक्के ऑनलाईन आणि ४० टक्के ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
ते आज नांदेड मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. ह्या परीक्षा सर्व १३ अकृषि विद्यापीठात येत्या ३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान होतील, राज्यातल्या उर्वरित विद्यापीठात ९० ते ९५ टक्के ऑनलाईन परीक्षा आयोजित केल्या जातील. सर्व विद्यापीठांतर्गत एकूण ७ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, असंही सामंत यांनी सांगितलं.