माथाडींचे दैवत स्व.अण्णासाहेब पाटील यांची ८७ वी जयंती साजरी
पिंपरी : कष्टकरी, गोरगरीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी आयुष्य वेचणारे व माथाडी कामगारांचे दैवत स्व. अण्णासाहेब पाटील यांची आज शुक्रवारी (दि. २७) रोजी पिंपरी चिंचवड शहरात ८७ वी जयंती साजरी करण्यात आली. केसबी चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद व माथाडी कामगारांच्या वतीने पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम सामाजिक सुरक्षितता राखून करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद, कार्याध्यक्ष मोरे, सरचिटणीस प्रवीण जाधव, सल्लागार बाळासाहेब शिंदे, खंडू गवळी मामा, मुरलीधर कदम, भिवाजी वाटेकर, मारुती आप्पा कौदरे, सर्जेराव कचरे, संदीप मधुरे, पांडुरंग काळोखे, आबा मांढरे, सतीश. कंठाळे, श्रीकांत मोरे, सुनील सावळे, गोरख दुबाले, शंकर शिंदे, गुलाब शिंदे, सोमा फुगे यांच्यासह पिंपरी चिंचवड व चाकण-तळेगाव एमआयडीसीमधील माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इरफान सय्यद म्हणाले की, पाटण तालुक्यातील मंडुळ कोळे या गावी जन्मलेल्या आण्णासाहेबांनी कुटुंबाच्या चरितार्थासाठी मुंबई गाठली. मुंबईमध्ये आल्यानंतर उसाच्या चरकावर आपल्या कष्टकरी जीवनाला प्रारंभ केला. तेथुन त्यांनी दारूखाना परिसरात अनेक ठिकाणी ओझे वाहण्याची कामे केली. ही कामे करत असताना कामगारांना मिळणारा मोबदला आणि मालकांच्याकडुन होणारी पिळवणूक पाहुन त्यांचे मन तळमळायचे. या तळमळीतुनच त्यांनी माथाडी कामगार चळवळीचा लढा सुरू केला. तत्कालीन लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करून माथाडी कायदा आमलात आणला. त्यांच्या महान कार्यामुळेच आज माथाडी संघटना एक बलाढ्य संघटना म्हणून ओळखली जात आहे. याचे खरे श्रेय त्यांनाच जाते. आण्णासाहेब पाटील यांनी लाखो कष्टकरी, मालवाहु, माथाडी कामगारांना ताठ मानेने जगायला शिकविले. माथाडी कामगारांनी याची जाणीव ठेऊन त्यांचा लढा पुढे तेवत ठेवण्याचे महान कार्य केले पाहिजे.