मुंबई (वृत्तसंस्था) : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम’ तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबिले आहेत त्याचं कौतुक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला देशातलं सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेलं राज्य करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधल्या कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा त्यांनी काल आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या महत्वाकांक्षी मोहिमेचा दर्जा चांगला ठेवून ती अधिक परिणामकारक करण्यासाठी त्यांनी यावेळी सूचना केल्या.

या बैठकीत औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्रीही दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांच्या कार्यगटातल्या डॉक्टरांशी संवाद साधून वैद्यकीय उपचार आणि इतर उपायांच्याबाबतीत चर्चा करायच्या सूचना केल्या. पालक सचिवांनीही याबाबतीत तातडीने त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात समन्वयाच्या दृष्टीने पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात राहावं, अशी सूचनाही त्यांनी केली.