अरूणाचल प्रदेशातल्या नेचिफू बोगद्याचा राजनाथ सिंह यांच्या हस्ते शिलान्यास

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 44 प्रमुख कायमस्वरूपी पूल राष्ट्राला  समर्पित केले. देशाच्या पश्चिम, उत्तर आणि ईशान्येकडील संवेदनशील सीमा भागामध्ये रस्ते आणि पुलांच्या माध्यमातून कायमस्वरूपी संपर्क व्यवस्था केल्यामुळे नवीन युगाची नांदी झाली आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरूणाचल प्रदेशातल्या नेचिफू बोगद्याचा शिलान्यास केला. या बोगद्यामुळे अतिदुर्गम प्रदेशातल्या जनतेला संपर्क सुविधा मिळू शकणार आहे त्याचबरोबर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा बोगदा अतिशय महत्वाचा ठरणार आहे. आज देशाला समर्पित करण्यात आलेले 44 पूल सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत. व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री डाॅ. जितेंद्र सिंह, संरक्षण कर्मचारी प्रमुख जनरल बिपीन रावत, लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे आणि संरक्षण सचिव अजय कुमार यांनी नवी दिल्लीतून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तसेच केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू, अरूणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, सिक्कीम आणि उत्तराखंड या राज्यांचे मुख्यमंत्री आणि जम्मू आणि काश्मिरचे नायब राज्यपाल, संसदेतील खासदार, नागरी आणि लष्करी विभागातील वरिष्ठ अधिकारी, तसेच वेगवेगळ्या राज्यातले, केंद्रशासित प्रदेशातले नेते व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून ठिकठिकाणाहून या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात बीआरओ म्हणजेच सीमा रस्ते संघटना खात्याचे महा संचालक आणि सर्व श्रेणीच्या अधिकारी वर्गाचे अभिनंदन केले. एकाचवेळी 44 पूल राष्ट्राला समर्पित करणे, हा एक विक्रम आहे असे सांगून सिंह म्हणाले, कोविड-19 महामारीच्या आव्हानात्मक काळ आहेच त्याचबरोबर पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून सरहद्दीवर तणावाची स्थिती निर्माण केली जात आहे. त्यांचा देशाला सामना करावा लागत आहे. असे वाद सुरू असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशामध्ये सर्व क्षेत्रामध्ये विकासाची कामे होत आहेत आणि ऐतिहासिक बदल घडवून आणले जात आहेत.

या पुलांची कामे पूर्ण झाल्यामुळे आता संपूर्ण वर्षभर सशस्त्र दलाला वाहतूक करणे शक्य होणार आहे तसेच त्यांना लागणारी सामग्री, रसद पुरविणे शक्य होणार आहे, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.

सन 2008 ते 2016 या कालावधीमध्ये बीआरओच्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये 3,300 कोटी रुपयांवरून 4,600 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली होती. यांनतर मात्र 2020-2021 यावर्षात बीआरओच्या अंदाजपत्रकामध्ये मोठी म्हणजे 11,000 कोटी रुपये वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोविड-19 महामारी असतानाही बीआरओच्या अंदाजपत्रकामध्ये घट करण्यात आलेली नाही.

सरकारने बीआरओचे अभियंते आणि कामगार यांच्यासाठी अतिउंचावर वापरण्यासाठी योग्य ठरतील, अशा कपड्यांच्या खर्चाला मान्यता दिली असल्याची घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी केली.

अरूणाचल प्रदेशातल्या तवांगकडे जाणा-या नेचिफू बोगद्याची पायाभरणी यावेळी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली. 450 मीटर लांबीचा हा दुहेरीमार्गाचा बोगदा नेचिफू खिंडीतून जात आहे. हा बोगदा रणनीतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा ठरणार आहे. या बोगद्यामुळे संपूर्ण वर्षभर आणि सर्व प्रकारच्या हवामानामध्ये नेचिफू खिंडीपलिकडील भागाशी संपर्क ठेवणे शक्य होणार आहे. तसेच हा   भाग अपघातप्रवण आहे, त्यामुळे वाहनांसाठी खिंडीतून सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे या पुलांचे काम होत आहे. दुर्गम सीमावर्ती भागाच्या सर्वांगीण विकास आणि आर्थिक वृद्धीला हातभार लावण्यासाठी तसेच सामरिकदृष्टीने महत्वाच्या क्षेत्रामध्ये सशस्त्र लष्कराला तातडीने तैनात करणे या नवीन पुलांमुळे शक्य होणार आहे, असे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले.

बीआरओच्यावतीने रस्त्यांची कामेही वेगाने पूर्ण करण्यात येत आहे, त्याचबरोबर गेल्या वर्षी या संघटनेच्यावतीने 28  पूल बांधून पूर्ण केले. तर 102 पुलांचे काम यावर्षी होईल,  अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. या संघटनेने यंदा 54 पुलांचे काम याआधीच पूर्ण केली आहेत. तसेच संघटनेची 60 बेली ब्रिजेसचे (लोखंडी भिंतीसारखे पूल) काम सुरू आहे. सशस्त्र दलाला तातडीने साधन सामग्री पोहोचती करण्यासाठी त्याचबरोबर अतिदुर्गम भागात वास्तव्य करणा-या लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी,  असे बेली पूल बांधण्यात आले आहेत.

कोविड-19 महामारी असतानाही बीआरओचे कार्य सुरू आहे. यामध्ये या संघटनेने तयार केलेला रोहतांगचा अटल बोगदा, सेला बोगदा  यांचा समावेश आहे, असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.