नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषि कायद्यांमुळे, शेतकऱ्यांना अन्नदात्याच्या भूमिकेतून बाहेर पडून उद्योजक बनण्याची संधी निर्माण झाली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून केल्यानंतर बोलत होते. स्थानिक अर्थव्यवस्था आणि स्थानिक उद्योगाचं मॉडेल देशाला निश्चितच पुढं नेईन, असं ते म्हणाले.
यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्रात साखर उद्योगात झालेली क्रांती, तसंच गुजरातमधे दूध, तर पंजाबात गव्हाच्या उत्पादनात झालेल्या क्रांतीचा आवर्जून उल्लेख केला. स्वातंत्रोत्तर काळात अन्नदान्याची वाढती गरज भागवण्यासाटी उक्पादनवाढीवर सरकारनं भर दिला. मात्र त्यातून शेतकऱ्यालाही फायदा झाला पाहिजे, याकडे लक्ष देणं सरकारला शक्य झालं नाही. पाहिल्यांदाच या मानसिकतेत बदल झाला असून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी पावली उचलली जात आहेत, असं मोदी म्हणाले.
महाराष्ट्रातल्या दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या २६ योजना पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत काम सुरू केलं, त्यापैकी नऊ योजना आतापर्यंत पूर्ण झाल्या असून, यामुळे सुमारे पाच लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्याचं, त्यांनी सांगितलं.