मुंबई : माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ तसेच विविध क्षेत्रात पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजक पुरस्कारप्राप्त,नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी आदी उत्कृष्ट काम करणारे माजी सैनिक, माजी सैनिकांच्या, शहीद सैनिकांच्या विधवा पत्नी, पाल्य यांना रोख स्वरुपात विशेष गौरव पुरस्कार जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत देण्यात येतो. 2019-20 या वर्षातही विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार असून यासाठी 20 सप्टेंबर 2019 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई शहरच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
माध्यमिक शालान्त परीक्षा, उच्च माध्यमिक परीक्षेमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेले व 2019-20 मध्ये पुढील शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, आयआयटी/
आयआयएम/ एआयआयएमएस येथे प्रवेश मिळालेले माजी सैनिकांचे पाल्य तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य आदी क्षेत्रात पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजक पुरस्कार मिळविणारे, पूर, आग, अपघात आदी नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी तसेच देश व राज्याची प्रतिष्ठा वाढेल. अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, पाल्य यांना हे पुरस्कार देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्तरासाठी 10 हजार रुपये तर आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 25 हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यासाठीचे अर्ज जिल्हा सैनिक कार्यालयात उपलब्ध आहेत. पात्रता धारकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या 022-22700404 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी कळविले आहे.