नवी दिल्ली : प्रदुषणाची समस्या सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज केंद्रीय वनं आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली आहे. ते आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून वायु प्रदुषण रोखण्यासाठी केंद्र शासनानं केलेल्या उपाययोजनांविषयी संवाद साधत होते. चारचाकी वाहनांच्या वापरामुळे वायु प्रदुषणात मोठी भर पडते. त्यामुळे अगदी जवळच्या कामांसाठी नागरिकांनी सायकल वापरावी असं आवाहन त्यांनी केलं.
वायु प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक पावलं उचलली. देशात प्रदुषणकारी घटकांच्या उत्सर्जनांसंदर्भातली बीएस सीक्स मानकं लागू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. यामुळे येत्या काळात देशातल्या प्रदुषणाच्या पातळीत मोठी घट झाल्याचं दिसून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मेट्रो रेल्वे आणि सीएनजीवर चालणाऱ्या बसमुळे प्रदूषणाची पातळी कमी झाली आहे, अनेक राज्यात या सेवा सुरु होणार आहेत, त्यामुळेही प्रदुषणात घट झालेली पाहायला मिळेल असं ते म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं २०१४ साली राष्ट्रीय वायु गुणवत्ता निर्देशांक सुरु केला. हा निर्णय म्हणजे वायु प्रदुषणाविरुद्धच्या लढ्यातलं महत्वाचं पाऊल होतं असं जावडेकर म्हणाले.






