नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अर्थात, डीआरडीओच्या खरेदीविषयक नियमावली २०२० ला आज मंजुरी दिली आहे. यामुळे स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह अधिकाधिक भारतीय उद्योगांना संरक्षण क्षेत्रातल्या संशोधन आणि विकास उपक्रमांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. तसंच यामुळे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेचं उद्दिष्टही साध्य होण्यास सहाय्य होईल, असं संरक्षण मंत्रालयानं ट्विट केलं आहे.

  डीआरडीओच्या नव्या अधिग्रहण नियमावलीत खरेदी प्रक्रीया सुटसुटीत केली असून त्यामुळे स्वदेशी संरक्षण उद्योगांना निर्मिती आणि विकास उपक्रमांमध्ये सहभागी होता येईल, तसंच यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारतचं स्वप्न साकार होण्यासही सहाय्य होईल, असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.