नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सात लाखाच्या खाली आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात सध्या ६ लाख ९५ हजार ५०९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.
देशभरात आज सकाळी संपलेल्या २४ तासात सुमारे ७४ हजार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आत्तापर्यंत देशभरातले ७० लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याबरोबरच देशातले कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ८९ पुर्णांक ५३ शतांश टक्के झाले आहे.
याच काळात देशात ६९० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे देशातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख १७ हजार ३०६ झाली आहे. सध्या देशातला कोरोना मृत्यदर १ पुर्णांक ५१ शतांश टक्के इतका आहे.
या चोवीस तासात देशात ५४ हजार ३६६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचीही नोंद झाली. यामुळे देशातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७७ लाखाहून जास्त झाली आहे.
दरम्यान देशभरातल्या कोरोना चाचण्यांच्या संख्येने १० कोटीचा टप्पा पार केला. आत्तापर्यंत देशभरात एकूण १० कोटी एक लाखापेक्षा जास्त कोरोना चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात, आयसीएमआरने दिली आहे. देशात काल एकाच दिवसात १४ लाख ४२ हजाराहून जास्त कोरोना चाचण्या झाल्याचेही आयसीएमआरने कळवले आहे.