नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं ७५ लाखाचा टप्पा पार केला आहे. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१ पूर्णांक ६८ टक्के इतकं झालं आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही सध्या असलेल्या बाधित रुग्णांपेक्षा १३ पटीनं जास्त आहे. गेल्या २४ तासांत ५३ हजार रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ७५ लाख ४५ हजार रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.

देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असून, सध्या पाच लाख ६१ हजार ९०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशभरात वाढलेली वैद्यकीय पायाभूत सुविधा, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे केंद्राच्या मानक उपचार पद्धतींची अंमलबजावणी, यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं घट होत असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

डॉक्टर्स, परिचारीका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समर्पणामुळे आणि वचनबद्धतेमुळे, या संसर्गानं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणंही अत्यल्प असल्याचं, मंत्रालयानं नमूद केलं आहे. जगभरात भारतात कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वात कमी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४९ टक्के इतका आहे.