मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात राष्ट्रीय होमिओपॅथिक संस्थान उभारण्याचं आश्वासन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिलं आहे. ते बीड इथल्या सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयानं घेतलेल्या वेबिनार सीरिजच्या समारोपप्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते.
आरोग्यमंत्री राजेश टोपे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी केलेल्या भाषणात केंद्रीय आयुष मंत्र्यांनी बीड आणि उस्मानबादसह राज्यात पाच जिल्ह्यात आयुष रुग्णालयांना मान्यता देणार असल्याचं जाहीर केलं.
देशातल्या सर्वच होमिओपॅथिक महाविद्यालयात प्रवेश संख्या कमी होत असल्यामुळे एनईईटी नीट पर्सेंटाइल कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. होमिओपॅथी वैद्यकीय शिक्षणामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथी हे विधेयक आणत असल्याचं, नाईक यांनी सांगितलं.
त्यामुळे होमिओपॅथी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाची गती वाढेल तसंच शिक्षणाचा दर्जा सुधारेल असा विश्वास केंद्रीय आयुष मंत्र्यांनी व्यक्त केला.