मुंबई : राज्यात कोरोनाचा आलेख उतरता असुन रुग्णांची संख्या कमी होत आहेत हे चांगले लक्षण आहे परंतु जनतेने बेपर्वाई बाळगू नये. योग्य ती खबरदारी घ्यावी. प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलावी आणि शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने झालेल्या ठाणे जिल्हयातील कल्याण आर्ट गॅलरी येथील कोविड रुग्णालयाचा आणि टिटवाळा येथील कोविड रुग्णालयाचे ई लोकार्पण झाले. या कार्यक्रमास नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील,खासदार श्रीकांत शिंदे,आमदार विश्वनाथ भोईर, महापौर विनिता राणे, आयुक्त- कल्याण डोंबिवली डॉ. विजय सूर्यंवशी, मनपा लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, इतर देशांमध्ये (साथीच्या रोगाचा) आजार वाढत असताना आपण सावध रहाणे आवश्यक आहे. राज्यातील महामारीची लाट आपण एकत्रितपणे रोखली पाहिजे. दिवाळीच्या उत्सवात अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.
ठाणे जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे उल्लेखनीय काम झाले आहे. यासाठी जिल्हा प्रशासन व नागरी संस्थांचे कौतुक करुन यापुढे ही योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना मुख्यमंत्री यांनी केल्या.
फेरीवाले, रिक्षाचालक, टॅक्सी चालक, दुकानदार इत्यादींसह जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची वारंवार तपासणी केल्याने कोरोनाला आळा घालणे शक्य आहे. शासकीय कार्यालयात अभ्यागतांना भेटण्यासाठी कार्यालयांमधील मोकळ्या जागेत भेट देण्यासाठी अतिरिक्त सुविधा करावी, अशा सूचना करुन मुख्यमंत्री म्हणाले, दीपोत्सवाच्या नंतर काही धार्मिक मार्गदर्शक सूचना घेऊन प्रार्थनास्थळे उघडण्याच्या संदर्भात निर्णय देण्यात येईल. प्रदूषणामुळे केसेस वाढत असल्याचे दिल्लीचे उदाहरण त्यांनी दिले आणि त्यामुळे अशी परिस्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी राज्यातील प्रदूषण टाळावे आणि या दिवाळीत फटाके टाळावेत.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, कोरोना रुग्णांसाठी अगदी कमी कालावधीत उत्कृष्ट दर्जाची रुग्णालये उभारण्यात आली आहेत. टीमवर्कच्या बळावर हे शक्य झाले. अद्ययावत सुविधा ठाणे जिल्ह्यात विविध मनपांच्या माध्यमातून उभारण्यात आल्या आहेत. आज जिल्ह्यात एक रुग्णही बेडसाठी वंचित राहणार नाही यांची खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा कायमस्वरुपी करण्याच्या प्रयत्न राहिल, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.
भिवंडी तालुक्यासाठी हॉस्पिटलची आवश्यकता आहे. त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन खा.कपिल पाटील यांनी केले.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोविड काळात मतदारसंघात केलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.
मनपा आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी कोरोनाकाळात मनपाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
कल्याण पश्चिम लाल चौकी आर्ट गॅलरी येथील कोविड समर्पित रुग्णालय
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोविड रुग्णांसाठी कल्याण (प.) लाल चौकी येथील आर्ट गॅलरी व दुकान केंद्राच्या बीओटो तत्वावरील प्रकल्पाच्या बांधकामामध्ये सुमारे ४५०० “कोविड समर्पित रुग्णालय उभारण्यात आले. यामध्ये १०७ खाटांची सुविधा करण्यात आली आहे. यामध्ये ०३ खाटा ट्राय ऐजसाठी व ०३ खाटा डायलेसिस रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्या मजल्यावर २६० खाटांची ऑक्सिजन सुविधा असलेले बेड व दुसऱ्या मजल्यावर निवासी खाटा ५० आणि डॉक्टर व नर्सेकरिता निवास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ५० व्हेंटीलेटर्स, २४ वायपंप उपकरणे, १०.००० लि.क्षमतेचे लिक्विड ऑक्सीजन टॅक, तळमजल्यावर आय.सी.यु. कक्षाकरिता निगेटिव्ह प्रेशर ५.५ किलो वॅट क्षमतेचे ब्लोअर यूनिट १७ टन क्षमतेच २४ युनिट इत्यादीची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण इमारतीसाठी ६३० के.व्ही.ए, ये ट्रान्सफार्मर, आय.सी.यू करिता १२५ के.व्ही.ए. क्षमतेचे २ जनरेटर इत्यादी नव्याने बसविण्यात आलेले आहे.
टिटवाळा, रुक्मिणी गार्डन संकूल येथील सामान्य रुग्णालय
टिटवाळा(पूर्व) रुक्मिणी प्लाझा, महागणपती हॉस्पिटलजवळ या समावेशक आरक्षणांतर्गत महापालिकेच्या ताब्यात असलेल्या G+३ हॉस्पिटल इमारतीमध्ये कायमस्वरूपी सामान्य रुगणालय (तात्पुरते कोविड रुग्णालय) उभारण्यात आले असून इमारतीचे क्षेत्रफळ ९४२.०० चौ.मी. आहे. सदर इमारतीच्या तळमजल्यावर वातानुकुलित अतिदक्षता विभाग असून त्यामध्ये ०९ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
तळमजल्यावर डोनिंग, डोफिंग, प्रयोगशाळा, मेडिकल स्टोअर्स , रजिस्ट्रेशन इत्यादीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ०४ व्हेंटीलेटर्स, ०३ बायपॅंप उपकरणे इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे.पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर ६५ ऑक्सिजन बेड्सची सुविधा देण्यात आली असून संपूर्ण इमारतीसाठी वॉटर डिस्पेन्सर, वॉटर हिटर, सीसीटीव्ही कॅमेरा, जनरेटर,फायर एस्टिंग्युशर बसविण्यात आले आहेत.