न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची भाजप शहराध्यक्षांची धडपड
पुणे : महापालिकेत आणि राज्यात सत्ता असतानाही भाजपला भामा आसखेड योजना वेळेत पुर्ण करता आली नाही. पालकमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून ही योजना मार्गी लावली. त्यांच्या हस्तेच या योजनेचे लोकार्पण करण्याचा निर्णय महापालिकेतील पक्षनेत्यांच्या बैठकित घेण्यात आला आहे, असे असताना परस्परच माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्याची घोषणा म्हणजे न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याची धडपड असल्याची टिका वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे केली आहे.
आमदार टिंगरे यांनी याबाबत प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीची सत्ता असताना शहराच्या पुर्व भागाचा पाणी सोडविण्यासाठी भामा आसखेड योजना हाती घेण्यात आली. त्यासाठी जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत जवळपास 400 कोटींचा निधी आमच्या सरकारच्या काळात मंजुर झाला. ही योजना डिसेंबर 2017 पर्यंत पुर्ण करण्याची मुदत होती. मात्र, दुर्दवाने राज्यात आणि पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर ही योजना रखडली. तब्बल दोन वर्ष त्यास विलंब झाल्याने पालिकेला 100 कोटींचा भुर्दंड सहन करावा लागला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लगेचच पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे ही योजना मार्गी लावण्यासाठी आमदार म्हणून मी स्व:त पाठपुरावा केला. अजितदादांनी जिल्हाधिकारी आणि महापालिकेच्या अधिकार्यांच्या बैठका घेऊन रखडलेली ही भामा आसखेड योजना मार्गी लावली.
दिवाळीत वडगाव शेरीकरांना भामा आसखेडचे पाणी देऊ हा राष्ट्रवादी क़ाँग्रेसने दिलेले शब्द पुर्ण होत आहे. या योजनेचा लोकार्पण सोहळा अजित पवार यांच्या हस्ते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्याचा ठराव नुकताच पक्षनेत्यांच्या बैठकित मंज़ुर करण्यात आला आहे. मात्र, वर्तमानपत्रातून भामा आसखेड योजनेचे काम पुर्ण झाल्याची माहिती समजल्यावर भाजप शहराध्यक्षांना जाग आली आणि या योजनेचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करायचे याचा कोणताही अधिकार नसताना त्यांनी परस्पर घोषणा केली. पाच वर्ष आमदार असतानाही जगदिश मुळीक यांना योजना पुर्ण करता आली नाही. आता स्वत:चे अपयश लपविण्यासाठी न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याची ही त्यांची केविलवाणी धडपड आहे. मात्र, पुणेकर आणि प्रामुख्याने वडगाव शेरीतील नागरिक सुज्ञ आहेत. त्यांना ही योजना नक्की कोणामुळे मार्गी लागली, याची जाणीव असून पक्षनेतेंच्या ठरावानुसार अजित पवार यांच्या हस्तेच ही या योजनेचे उद्घाटन होईल असा दावा आमदार सुनिल टिंगरे यांनी केला आहे.