नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रासह, दिल्ली, गुजरात आणि आसाम या राज्यांनी कोरोनाविषयक सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केलेले व्यवस्थापन, तसेच मृतदेहांच्या अयोग्य हाताळणीसंदर्भात न्यायालयाने स्वतःहून दखल घेत आज सुनावणी केली. त्यावेळी न्यायमूर्ती अशोक भुषण यांच्या नेतृत्वाखालच्या पीठाने हे निर्देश दिले. या राज्यांमध्ये कोरोनाविषयक स्थिती गंभीर झाल्याबद्दल न्यायालयाने खडे बोलही सुनावले.

या चारही राज्यांनी आपल्या स्थितीदर्शक अहवालात, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आत्तापर्यंत केलेल्या उपाययोजना, भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता गृहीत धरून आखलेल्या उपाययोजना आणि कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून हवी असलेली मदत, याविषयी तपशीलवार माहिती सादर करावी, अशा सूचनाही न्यायालयाने केल्या आहेत.