मुंबई (वृत्तसंस्था) : कार्तिक एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी आज पंढरपूर इथं विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी कवडुजी भोयर, कुसुमबाई भोयर, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

जगावर, देशावर कोरोनाचे संकट आहे, ते संकट दूर होऊ दे. कोरोनाची लस लवकर मिळू दे, असं साकडं राज्यातल्या सर्व जनतेच्या वतीनं विठ्ठलाला घातलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

विठ्ठल हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यामुळे सर्वच विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर असतात. कोरोनाचं संकट असलं तरी चर्चेतून चांगल्या पद्धतीचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचा असतो. कुणी याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला, तरी वारकरी संप्रदायानं त्याला साथ दिली नाही, याबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त केलं.