नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलियात आजपासून सुरु झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिल्या सामन्यात भारताचा ६६ धावांनी पराभव झाला. सिडनी इथं झालेल्या आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
कर्णधार अॅरॉन फिंच आणि स्टिव्ह स्मिथ यांनी शतकी खेळी केली. या दोघांच्या दमदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी ३७५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र प्रत्युतरादाखल निर्धारित ५० षटकांमधे भारत आठ गडी बाद ३०८ धावाच करू शकला.
भारताच्या वतीनं हार्दिक शिखर धवन आणि हार्दिक पंड्या या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठ महिन्यांनंतर भारतीय क्रिकेट संघाचा हा पहिलाच आतंरराष्ट्रीय सामना होता. दुसरा एकदिवसीय सामना येत्या २९ नोव्हेंबरला होणार आहे.