मुंबई (वृत्तसंस्था) : शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची ५५१ वी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्ताने नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारासह ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये विशेष कार्यक्रमातून गुरुनानक यांना अभिवादन केले जात आहे. गुरुद्वारांमध्ये सकाळपासून भजन, कीर्तन, कथा, व्याख्यान असे कार्यक्रम सुरु आहेत.

मुंबईत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या गुरुद्वारांमध्ये गुरुनानक जयंती ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईतील अंधेरी, बोरिवली, खार, मीरा रोड, दादर, भायखळा, विक्रोळी इथल्या गुरुद्वारांमधील भाविकांना घरातूनच समाजमाध्यमे, फेसबुक अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन आणि थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याचे आवाहन गुरुद्वारांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

गुरुद्वारांमध्ये येणाऱ्या भाविकांना मास्क लावणे, निर्जंतुकीकरण, सुरक्षित सामाजिक अंतर यांच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असून तशी व्यवस्था करण्यात आली आहे. लंगरचे आयोजन रद्द करून त्याऐवजी भाविकांना बंद पाकिटांचे वाटप करण्यात येत आहे. अशी माहिती युनायटेड सिंह सभा फाऊंडेशनचे अध्यक्ष राम सिंह राठोर यांनी आकाशवाणीला दिली आहे.

सातारा इथे साधेपणाने गुरुनानक जयंती शिख बांधवांनी साजरी केली. नेहमीचे सर्व धार्मिक कार्यक्रम पार पाडत यादिवशी लंगर सेवा मात्र बंद ठेवण्यात आली आहे.

धुळे शहरातील गुरुद्वारा येथे गुरुबाणी संत प्रवचन, रक्तदान शिबीर आणि विशेष लंगर आयोजित करण्यात आले.

कोल्हापूर, इचलकरंजी, पुणे इथल्या गुरुद्वारतही साधेपणाने उत्सव साजरा होत आहे.

गुरू नानक जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणतात की, प्रत्येकाशी सन्मानाने आणि प्रेमपूर्वक आदराने वागण्याची त्यांची शिकवण आजच्या काळात खूप महत्त्वाची आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.