मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी ८० वर्षापेक्षा जास्त वयाच्या तसेच दिव्याग मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.

टपाली मतदानासाठी नागपूर जिल्ह्यात २१८ मतदार असून कालपर्यंत १७९ मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली. मतदाराच्या घरी जाऊन टपाली मतपत्रिका त्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

३३ दिव्यांग मतदारांपैकी २६, तर ८० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या १८५ मतदारांपैकी १५३ मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे.

नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर सायबर सेलद्वारे करडी नजर ठेवण्याचे निर्देश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.

व्हाट्सअॅप किंवा अन्य समाज माध्यमांवर कोणी आक्षेपार्ह मजकूर टाकल्यास त्यावर कडक कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश सायबर सेलला दिले आहे. निवडणुकीला दोन दिवस बाकी असताना वृत्तपत्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या जाहिरातींचेही प्रमाणीकरण करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.