पुणे: पुणे शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी पीएमपीएमएलची बस, खासगी कंपन्यांच्या टॅक्सी आणि रिक्षा असे पर्याय सध्या उपलब्ध आहेत. मात्र एकाच व्यक्तीला प्रवास करण्यासाठी पुणे महापालिका शहरात भाडेतत्त्वावर सुमारे ५००० इलेक्ट्रॉनिक बाईक्स उपलब्ध करून देणार आहे.
खाजगी कंपनीच्या माध्यमातून या बाईक उपलब्ध होणार असून त्याची देखभाल दुरुस्तीही ही कंपनीच करणार आहे. या योजनेचा कोणताही खर्च महापालिका करणार नाही मात्र महापालिकेला उत्पन्नाच्या दोन टक्के महसूल मिळणार आहे.
शहरामध्ये बाईकची गरज कुठे लागेल यासाठी ५०० ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले असून प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी प्रति किलोमीटर ४ रुपये असा दरही निश्चित करण्यात आला आहे.
हवा प्रदूषण, वाहतूक कोंडी, बस वेळेत न मिळणे, रिक्षावाल्यांनी भाडे नाकारणे अशा अनेक समस्यांचा सामना कराव्या लागणाऱ्या पुणेकरांना इलेक्ट्रॉनिक बाईकच्या माध्यमातून एक नवी सेवा उपलब्ध होत आहे.