मुंबई : स्वातंत्र्यदिनी प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. ध्वजवंदनानंतर खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपुर्द करावेत, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
गृह विभागाने 22 एप्रिल 2015 रोजी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, इतर राष्ट्रीय कार्यक्रम व महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी राष्ट्रप्रेम दाखविण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर जसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्यासाठी योग्य कार्यपद्धतीची भारतीय ध्वजसंहिता 2002 मध्ये व अवमानप्रकरणात कारवाईबाबत राष्ट्रीय अवमान कायदा 1971 मध्ये तरतूद केलेली आहे.
खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज वापरानंतर त्याचा योग्य तो मान राखून ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार सन्मानपूर्वक नष्ट करणे आवश्यक असते. त्यासाठी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर एक आणि अंधेरी,बोरिवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी तालुकास्तरीय समित्या गठित करण्यात आल्या आहेत. असे खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपुर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था (एनजीओ) तसेच इतर संघटनांना देण्यात आलेले आहेत. नागरिकांनीही असे राष्ट्रध्वज एनजीओ किंवा इतर संघटनांकडे सुपूर्द करावेत. या एनजीओ किंवा इतर संघटनांनी असे राष्ट्रध्वज तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपूर्द करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.