मुंबई : राज्यात छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत मतदार नोंदणी, नोंदणीतील दुरुस्ती आदींसाठी शनिवार दि. १२ आणि रविवार दि. १३ डिसेंबर २०२० या सुटीच्या दिवशी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून मतदार नोंदणीच्या कामास सर्व राजकीय पक्षांनी बूथस्तरीय अभिकर्त्यांची (बीएलए) नेमणूक करुन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी केले.
छायाचित्र मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे मंत्रालयात आयोजित करण्यात आली. यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी आदी उपस्थित होते.
बलदेव सिंह म्हणाले, राज्यात सर्व विधानसभा मतदार संघात दि. 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांची विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीतील नोंदीच्या अनुषंगाने दि. 15 डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच नवीन मतदार नोंदणीचे कामही सुरू आहे. या सर्व बाबींसाठी येत्या शनिवार दि. 12 आणि रविवार दि. 13 डिसेंबर रोजी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. मतदान केंद्रस्तरावर ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या कामात प्रशासनाला बूथस्तरीय अभिकर्त्यांची (बूथ लेव्हल एजन्ट्स- बीएलए) चांगली मदत होऊ शकेल. बहुतांश ठिकाणी राजकीय पक्षांनी बीएलए नेमले असले तरी उर्वरित भागांसाठीही बीएलएंची नेमणूक करुन मतदार याद्या अचूक व्हाव्यात यासाठी सहकार्य करावे.
जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी व्हावी हा निवडणूक आयोगाचा हेतू आहे. तथापि, हे होत असताना त्यामध्ये कोणताही गैरप्रकार घडणार नाही याकडेही काळजीपूर्वक लक्ष देण्यात येत आहे. सध्याच्या कोविड कालावधीमध्ये मतदार नोंदणीचे अर्ज बऱ्याच प्रमाणात ऑनलाईन प्राप्त होत आहेत. प्राप्त ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्जांची पडताळणी करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा आणि कार्यपद्धती तयार आहे. तसेच या मोहिमेदरम्यान आलेल्या दावे आणि हरकतींच्या अर्जांची यादी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर मतदार संघनिहाय उपलब्ध आहे, असेही श्री. सिंह म्हणाले.
यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार याद्या पेन ड्राईव्हमध्ये उपलब्ध करुन द्याव्यात, मोहिमेची स्थानिक केबल वाहिन्यांवरुन मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी, आदी मागण्या केल्या.
यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी श्री. वळवी यांनी माहिती दिली की, या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेंतर्गत दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत दि. 5 जानेवारी 2021 पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्ययावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई आदी दि. 14 जानेवारी 2021 पर्यंत करुन दिनांक 15 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
पूर्वीच्या मतदार यादीतील मयत झालेल्या, इतरत्र स्थलांतरीत झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. अशा वगळण्यात आलेल्या नावांची यादी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुविधा http://www.nvsp.in या वेबपोर्टलवरही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.