मुंबई : अमेरिकन काँग्रेसच्या जॉर्ज होल्डींग, जो विल्सन, श्रीमती ल्युई फ्रँकेल, ज्युलिया ब्राउनली या वरिष्ठ सदस्यांच्या शिष्टमंडळाने विधानमंडळाला भेट देऊन राज्याच्या विधिमंडळ कार्यपद्धती, कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी आदींनी शिष्टमंडळाशी चर्चा केली.

महाराष्ट्रातील विधानमंडळाची रचना, कार्यपद्धती याची माहिती सभापती श्री. नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष श्री. बागडे आदींनी शिष्टमंडळाला दिली. तसेच अमेरिकेची लोकशाही पद्धती, कार्यपद्धतीची माहिती घेतली.

जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, पर्यावरणाशी निगडित समस्या,दहशतवाद, पायाभूत सुविधा प्रकल्प, औद्योगिक वृद्धी आदी विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था पद्धती, त्यामधील महिलांचे राजकीय प्रतिनिधीत्व, महिलांचे शिक्षण,आरोग्य तसेच सक्षमीकरण आदींविषयी माहिती देण्यात आली.

माजी आमदार आणि विधिमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे समन्वयक संजय दत्त, महाराष्ट्र विधानमंडळाचे उपसचिव विलास आठवले, अवर सचिव अ. मु. काज आदी याप्रसंगी उपस्थित होते.