नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे देशात खासगी सार्वजनिक भागीदारीचं एक नवं युग सुरू होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला.

भारतीय युवकांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जगभरात नावलौकिक मिळवला आहे; तसंच यश भारताला अंतराळ क्षेत्रातही मिळेल असं ते म्हणाले.

देशातील उद्योगपती, स्टार्टअप्स आणि शिक्षण तज्ञांना या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशानं तसंच या क्षेत्रातील उपक्रमांना चालना देण्यसाठी मोदी यांनी काल या मंडळींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

देशाच्या अंतराळ कार्यक्रमांचा फायदा गरीबातल्या गरीब जनतेला व्हावा, यासाठी नेमक्या उपाययोजना करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले. भारत लवकरच अंतराळ क्षेत्राशी निगडीत उपकरणं बनवणारा मोठा देश म्हणून उदयाला येईल आणि जगात स्पेस हब म्हणून ओळखला जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.