मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लरकारवर हल्ला चढवला. सर्व विषय बाजूला सारून मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा करावी, अशी मागी करत त्यांनी स्थगन स्थगन प्रस्तावाची सूचना दिली, मात्र सभापतींनी ती फेटाळली. त्यामुळे विरोधी पक्षांनी गदारोळ केला.

याबाबत नंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी सरकार आरक्षणावरुन समाजात फूट पाडत असल्याचा आरोप केला.विधानपरिषदेत गदारोळातच विविध कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर सादर करण्यात आली.

त्याआधी विनायक मेटे यांनी परिधान केलेले काळ्या रंगाचे आणि मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, असे वाक्य लिहिलेले कपडे काढण्याचे निर्देश सभापतींनी दिले. या कारणासाठी सभागृहाचं कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.

पुढचं कामकाजही गदारेळातच झालं. या काळात रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी तसंच कंगना राणावत यांच्याविरूद्ध मांडण्यात आलेल्या हक्कभंग ठरावावरच्या अहवालाला सादर करण्यासाठी पुढच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

गदारोळ प्रचंड वाढल्यामुळे अखेर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब केलं.ग्लोबल टीचर म्हणून आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित झालेले सोलापूरमधले शिक्षक रणजितसिंह डिसले गुरूजी यांच्या सन्मानार्थ त्यांना सरकारनं विधान परिषदेचं सदस्यत्व द्यावं, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.

सभापतींनी डिसले गुरूजींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर बोलताना दरेकर यांनी ही मागणी केली.