नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोरोना रुग्णांचा मृत्यू दर जागतिक स्तरावर सर्वात कमी म्हणजे १० लाख लोकसंख्येमागे केवळ १०५ इतका असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशातला कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ५३ शतांश टक्के झाला असून २५ हजारांहून अधिक कोविड रुग्ण गेल्या २४ तासात बरे झाले आहेत.
आत्तापर्यंत ९६ लाख ६ हजार पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून सध्या एकंदर ३ लाख ३ हजार रुग्ण देशभरात उपचार घेत आहेत. वेळेवर शोध, चाचणी, विलगीकरण आणि त्वरित रुग्णालय सेवा आणि योग्य उपचार यामुळेच, दैनंदिन मृत्यू ४०० पर्यंत मर्यादित राहात आहेत, असं मंत्रालायान म्हटलं आहे.
गेल्या २४ तासात २४ हजार ३३७ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्ण संख्या १ कोटी ५५ हजार झाली आहे. गेल्या २४ तासात देशभरात ३३३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकंदर मृत्यू संख्या १ लाख ४५ हजार ८१० झाली आहे.
देशाचा सध्याचा मृत्यू दर १ पूर्णांक ४५ शतांश टक्के असून जागतिक तुलनेत तो सर्वात कमी आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासात ९ लाख कोरोना नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या असून आत्तापर्यंत एकूण १६ कोटी २० लाख नमुने तपासण्यात आले आहेत.