मुंबई (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर महिन्यात मराठवाड्यात अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा, आज केंद्रीय पथक करत आहे. औरंगाबाद, पैठण आणि गंगापूर तालुक्यातल्या ९ गावात केंद्रीय पथकानं नुकसान झालेल्या शेतांची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

निपाणि, पांढरी पिंपळगाव, गाजीपुर, शेकटा, नायगाव तसंच ढोरगाव इथं शेतातल्या मका, बाजरी, सोयाबीन, मोसंबी या पिकांची पाहणी केली.  राज्य सरकारकडून मदत मिळाली का ? खतं, बियाणे मिळाले का तसंच किती नुकसान झालं ? असे प्रश्न केंद्रीय पथकानं शेतकऱ्यांना विचारले.

मराठवाड्यातल्या ३४ लाख शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल प्रशासनानं सादर केला आहे. दरम्यान, औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात काल झालेल्या बैठकीत पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अतिवृष्टी आणि पुरपरिस्थीतीमुळे झालेल्या शेतातल्या पिकांची आणि इतर नुकसानिची सविस्तर माहिती दिली. बैठकीत केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे सहसचिव रमेशकुमार गंता, केंद्रीय अर्थ व नियोजन विभागाचे सल्लागार आर.बी.कौल, ग्रामीण विकासाचे उपसचिव यशपाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हे केंद्रीय पथक २६ डिसेंबरपर्यंत मराठवाड्यात पाहणी करणार आहे. मराठवाड्यात आलेल्या केंद्राच्या पथकानं अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या वाकुळणी,बाजार वाहेगाव इथं आज पाहणी केली.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील सुमारे ५ लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. आर पी सिंग आणि एन.एस सहारे यांच्या पथकाने अतिवृष्टीच्या वेळी पिकाची परिस्थिती,वाढ किती होती याची तपशीलवार माहिती घेतली. यावेळी जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  निमा अरोरा आणि इतर अधिकारी उपस्थित होते.