मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रोची कामं दर्जेदार असावित आणि ती निर्धारित वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ठाकरे यांनी काल बई मेट्रोच्या अंधेरी एल-सेव्हन स्थानक, अकुर्ली मेट्रो स्थानक, दहिसर रेल्वे उड्डाण पूल, चारकोप मेट्रो डेपो आणि डी.एन. नगर मेट्रो स्थानकाला भेट देऊन तिथल्या कामांच्या प्रगतीची पाहणी करून आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
या भेटीत मुख्यमंत्र्यांनी चारकोप मेट्रो डेपोत मेट्रोच्या मार्गिंकांवर, मेट्रो इंजिनीच्या चाचणीच्या तयारीचीही माहिती घेतली. यावेळी ठाकरे यांनी मेट्रो रेल्वेच्या आत्तापर्यंत झालेल्या कामांबद्दल समाधानही व्यक्त केलं.मुंबई महानगर प्रदेश विकास विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव, मेट्रो रेल्वे प्रकल्पाशी संबंधित प्रकल्पाचे आणि राज्य शासनाचे अधिकारीही या पाहणीत सहभागी झाले होते.