मुंबई : महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्च सेंटरचे एम.ए.रंगुनवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अँड रिसर्च, पुणे संस्थेची प्रवेशक्षमता आता दुप्पट झाली आहे. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून बी.पी.टीएच या भौतिकोपचार पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता 30 वरुन 60 इतकी करण्यात आली आहे.
या महाविद्यालयातील भौतिकोपचार पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थी प्रवेशक्षमता 60 इतकी असणार आहे. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने भौतिकोपचार अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, 1987 मधील तरतुदींचे संस्थेने काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. भौतिकोपचार महाविद्यालयातील प्रवेशक्षमता वाढीस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर संस्थेत विद्यार्थी प्रवेश देण्यात येतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.