मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आता चित्रपट, टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण पाहण्याची तसंच कलाकारांसोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय आणि स्टारक्राफ्ट मनोरंजन प्राईम लिमिटेड यांच्यामध्ये काल पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
याचबरोबर राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर त्या ठिकाणांचा इतिहास, वैशिष्ट्ये आदींची माहिती देणारे ऑफलाईन क्यूआर कोडचे फलक लावण्यात येणार असून, यासाठी पोलक्स स्टार एलएलपी यांच्यासोबत सामंजस्य करार झाला आहे.
मुंबईत पुढील महिन्यात होणाऱ्या दी मुंबई फेस्टीव्हल संदर्भात तसंच राज्यातल्या खाद्य संस्कृतीला चालना देणारे सामंजस्य करारही यावेळी करण्यात आले. याशिवाय राज्यात विविध भागात सुरु झालेल्या कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं.