नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याच्या दरात आणखी वाढ होऊन तो आता ९६ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. गेल्या २४ तासात एकंदर २९ हजार ९१ रुग्ण बरे झाल्यामुळे देशातील आतापर्यंत बरे झालेल्या कोविड रुग्णांची एकूण संख्या आता ९९ लाख ७५ हजार ९५८ वर पोहोचली आहे.

सध्या जवळपास २ लाख ३१ हजार कोरोनाबाधितांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. सध्या उपचार सुरू असलेल्या बाधितांचे प्रमाण एकूण बाधितांच्या संख्येच्या तुलनेत २ पूर्णांक २३ शतांश टक्के इतकेच  असल्याची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली.

काल दिवसभरात एकूण १६ हजार ३७५ नवे कोरोनाबाधित आढळल्याने देशात आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १ कोटी ३ लाख ५६ हजार झाली आहे.

गेल्या २४ तासात २०१ कोविड रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. देशात आतापर्यंत एकंदर एक लाख ४९ हजार ५० कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारताचा कोविडचा मृत्यूदर सध्या जगातील सर्वात कमी मृत्यू दरांपैकी असून तो १ पूर्णांक ४५ शतांश टक्के इतका आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासात देशात कोविडच्या निदानासाठी ८,९६,००० जास्त चाचण्या करण्यात आल्याचे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने म्हटले आहे.