नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला आत्मनिर्भर बनवण्यात स्टार्टअप्स महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कोरोनाच्या साथीच्या काळात सॅनिटायझर्स, पीपीई किट्स उपलब्ध होण्यासाठी तसेच इतर आवश्यक उत्पादनांची  पुरवठा साखळी  खंडित होऊ न देण्यातही स्टार्टअप्सनी मोलाची भूमिका बजावल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल केले. प्रारंभः स्टार्ट अप इंडिया आंतरराष्ट्रीय परिषदेत ते काल बोलत होते.

दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कोरोना काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, औषधं घरपोच पुरवणे, आघाडीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करणे, ऑनलाईन शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना पोहोचवण्याचे उल्लेखनीय कामही स्टार्टअप्सनी केल्याचे प्रधानमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.

संकटाच्या काळातही संधींचा शोध घेऊन बिकट परिस्थितीतही आश्वासक वातावरण निर्माण करण्यात स्टार्टअप्सनी बजावलेल्या कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली.