सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांच्या पाठपुराव्यास यश
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात येत असलेल्या पुलाला ‘जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज’ (भक्ती-शक्ती) उड्डाणपुल असे नामकरण करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आज अखेर पिंपरी महापालिकेच्या महासभेत मान्य करण्यात आला. यासाठी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपुल व ग्रेडसेपरेटर बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्पामधील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सद्यस्थितीत रोटरी व ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वाकडे आहे. प्रकल्प चालू करण्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी दि.२५ मे २०१८ रोजी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते.
‘निगडी भक्ती-शक्ती चौक येथून जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळयाचे वारकरी सांप्रदायासह पिंपरी चिंचवड शहरात प्रस्थान होते. अवघ्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील जनसमुदाय हा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी निगडी येथे जमलेला असतो. त्यामुळे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेकडून निगडी भक्ती शक्ती चौक येथे बांधण्यात येणा-या उड्डाणपुलास “जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज (भक्ती शक्ती)” उड्डाणपुल’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत ‘फ’ प्रभाग समितीने ०४ जून २०१८ रोजी या उड्डाणपुलाचे नाव ‘जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज’ (भक्ती-शक्ती) देण्याचा ठराव मंजुर केला होता. तथापि, महापालिका कार्यक्षेत्रातील प्रकल्पांना नाव देण्यापूर्वी महासभेची मान्यता घेणे आवश्यक असते. या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी महासभेसमोर ठेवला होता, अखेर हा प्रस्ताव दि. २० जानेवारी २०२१ रोजी झालेल्या महासभेकडून मान्य करण्यात आला. सदर मागणी मान्य केल्यामुळे दिपक खैरनार यांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.