नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ज्यो बायडन यांनी काल वॉशिंग्टन येथे कॅपीटॉल इमारतीच्या साक्षीने शपथ घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत हा दिमाखदार शपथ विधी सोहळा झाला. ७८ वर्षीय बायडन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयोवृद्ध राष्ट्रपती ठरले आहेत.
राष्ट्रपती झाल्यानंतर बायडन यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्या भाषणात देशातील उच्च श्वेतवर्णीय वर्चस्व आणि राजकीय अतिरेक दूर करणे आपल प्राधान्य राहणार असल्याचे बायडेन म्हणाले, आपण देशातील सर्व अमेरिकन नागरिकांचे राष्ट्रपती आहोत असे सांगून त्यांनी देशाला एकजूट करण्याचा संकल्प यावेळी बोलताना व्यक्त केला.
सध्याच्या कठीण परीक्षेच्या काळातून जाताना अमेरिका अधिक भक्कम झाली आहे. आपण सर्व राजकीय गटांना एकत्र करून त्यांच्या बरोबर एकजूट निर्माण करू, असे आश्वासनही बायडन यांनी यावेळी दिले.
यावेळी अमेरिकेच्या ४९ व्या उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरिस यांनी ही शपथ घेतली. अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती होण्याचा सन्मान त्यांना मिळाला. तसेच अमेरिकेच्या उपराष्ट्रपती या उच्चपदावर विराजमान होणाऱ्या कमला हॅरिस या भारत आणि जमेईका या दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्याच व्यक्ती ठरल्या आहेत.
या सोहळ्यात लेडी गागा यांनी अमेरिकेच राष्ट्रगीत गायल तर जेनिफर लोपेज यांनी अमेरिकी नौदल बॅड बरोबर देशभक्तीपर गीत सादर केले. या शपथविधी कार्यक्रमाला अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा, जॉर्ज डब्ल्यू बुश, आणि बिल क्लिंटन उपस्थित होते.
दरम्यान, शपथविधी सोहळ्यापुर्वी अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात बायडेन प्रशासनाला शुभेच्छा दिल्या आणि व्हाईट हाउसचा निरोप घेऊन आपली पत्नी मिलेनिया ट्रम्प यांच्याबरोबर फ्लोरिडाकडे विमानाने रवाना झाले.