मुंबई (वृत्तसंस्था) : एक प्रगत देश म्हणून उदयास येण्याच्या निर्णायक वळणावर देश उभा असताना युवा पिढीने निष्ठा आणि समर्पण भावनेने कार्य केल्यास देशात सुवर्णयुग येईल, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. राज्यातील लोक विविध क्षेत्रात नवोन्मेष आणि नवसृजनातून उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून ते युवा पिढीला निश्चितपणे प्रेरणा देईल, असा विश्वासही  राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. सेंद्रिय शेती, बांधकाम व्यवसाय, उद्योग, आदरातिथ्य, आरोग्यसेवा यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्याउ ३४ निवडक व्यक्ती आणि संस्थांना राज्यपालांच्या उपस्थितीत काल लोकमत ट्रेंड सेटर्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

पुरस्कार सोहळ्याला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळे तसंच लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा उपस्थित होते. पुरस्कारार्थींचा कार्याचा उल्लेख असलेल्या ‘लोकमत ट्रेंड सेटर्स’ या कॉफी टेबल पुस्तकाचे देखील राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले. देश आज अभूतपूर्व अशा कालखंडातून जात आहे. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत. अशावेळी नवउदयमी युवक देशाला खूप पुढे नेऊ शकतात. असे राज्यपालांनी सांगितले.