नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेशातल्या ऊर्जा क्षेत्रातल्या परस्पर सहकार्यासंबंधिच्या सुकाणू समितीची एकोणिसावी बैठक काल ढाका इथं झाली. या आधी झालेल्या बैठकीतल्या निर्णयांच्या अंबलबजाणीच्या प्रगतीचा आढावा कालच्या बैठकीत घेतला गेला. याशिवाय रामपाल इथं उभारल्या जात असलेल्या तेराशे वीस मेगावॉटच्या मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाच्या सद्यस्थितीवरही या बैठकीत चर्चा झाली असं, बांग्लादेशातल्या भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
भविष्यात उर्जा क्षेत्रातलं परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. उर्जा सचिव संजीव नंदन सहाय यांनी या बैठकीतल्या भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं, तर बांग्लादेशाचे उर्जा सचिव मोहम्मद हबीबूर रहमान यांनी बांग्लादेशाच्या शिष्टमंडळाचं प्रतिनिधित्व केलं.