मुंबई : नागपूर येथील पत्रकारांची संघटना असलेल्या पत्रकार क्लब ऑफ नागपूर या संघटनेच्या सभासदांसाठी करमणूक क्लब सुरु करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या स्वाती बंगल्याची जागा 30 वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

पत्रकार क्लब ऑफ नागपूर या संघटनेच्या सभासदांकरिता जिमखाना स्थापन करण्यासाठी तसेच या सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी या जागेचा अर्धवाणिज्यिक विकास करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती संघटनेच्या अध्यक्षांनी शासनाकडे केली होती. तसेच यापूर्वी नागपूर येथील मौजे गाडगा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेला स्वाती बंगला सार्वजनिक बांधकाम विभाग व पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांच्यात १७ डिसेंबर २०१६ ला झालेल्या करारानुसार ५ वर्षांसाठी वार्षिक अनुज्ञप्ती भरण्याच्या अटीवर संघटनेस देण्यात आला असून या जागेवर सध्या या  संघटनेचे उपक्रम होत आहेत. ही जागा वार्षिक नाममात्र दराने भुईभाडे आकारून भाडेपट्ट्याने देण्यात यावी अशी विनंती या संघटनेकडून करण्यात आली होती. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्वाती बंगल्याची ३७४४.४० चौ.मी. इतकी जमीन पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांना  नियमित अटी व शर्तींवर विशेष बाब म्हणून नाममात्र भाडे आकारून ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला.