नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आज 73 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीतील राजघाट या गांधीजींच्या स्मृतीस्थळी जाऊन पुष्पांजली अर्पण केली. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. हुतात्मा दिनानिमित्त देशभरात दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार  मंत्री हरदीप सिंग पुरी, सैन्यदलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग आणि वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनीही महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावर पुष्पांजली वाहिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विटर संदेशाच्या माध्यमातून गांधीजींना श्रद्धांजली वाहिली आहे.

तत्पूर्वी या सर्वांनी ट्विटरच्या माध्यमातून गांधीजींना आदरांजली वाहिली. गांधीजींच्या शांतता, अहिंसा, साधेपणा, मानवता या आदर्शांचा सर्वांनी अंगीकार केला पाहिजे असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे. गांधीजी शांतता, अहिंसा आणि निस्वार्थ सेवाभावाचे मूर्तीमंत उदाहरण होते.

आपले विचार आणि कृती यातून त्यांनी काळाच्या पटलावर आपला अमीट ठसा उमटवला आहे. त्यांनी समाजातील मागास, दलित घटकांच्या उद्धारासाठी अथकपणे काम केले असे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. बापूंचे आदर्श लाखो लोकांना प्रेरणा देणारे आहेत. हुतात्मा दिनी आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या सर्वांच्या त्यागाचे स्मरण केले पाहिजे अशा शब्दांत पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली आहे.